बाणेर : अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ आणि व्यापारी संघटना बाणेर यांच्या वतीने आयोजित साम्राज्य ग्रुप दहीहंडी उत्सव २०२६ यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचे आणि साहसी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दहीहंडीला ‘साहसी खेळाचा’ दर्जा देण्यात आल्याचे प्रात्यक्षिक. यावेळी भैरवनाथ मित्र मंडळ, शिरवळ आणि सहयोग मित्र मंडळ, चेंबूर या दोन पथकांनी चुरशीने पाच-पाच थर रचत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. तसेच मराठा गोविंदा पथक आणि चाराई नागरी गोविंदा पथक यांनी तब्बल सात थरांची सलामी देत उपस्थितांकडून दाद मिळवली.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बाणेर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. “खरे स्टार हेच आहेत,” या भावनेतून ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी गोपाळ भक्तांनी “गोपाल कृष्ण भगवान की जय” अशा घोषणा देत ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याशिवाय परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, चांगले काम करणारे नागरिक तसेच शासकीय कर्मचारी यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात यंदाचा दहीहंडी उत्सव पार पडला. पारंपरिक गोविंदा संस्कृतीसोबतच साहसी खेळाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद तापकीर, उपाध्यक्ष मंदार पोरे, कार्याध्यक्ष विनय चिवे तसेच अक्षय तापकीर, पंकज तापकीर, वैभव तापकीर, ओमकार तापकीर, गौरव तापकीर, जयेश तापकीर, मनोज पोळ, बापू बनसोडे, विशाल भगत आणि सागर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
















