सिटिझन ओपन डे’ प्रभावीपणे राबवा; ‘आप’ची महापालिका आयुक्तांकडे मागणी; नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट मिळत नसल्याचा आरोप; बैठका, दौरे टाळून सोमवारी ३ ते ५ या वेळेत अधिकारी उपलब्ध ठेवण्याची मागणी

पुणे | ७ सप्टेंबर २०२६ : पुणे महानगरपालिकेतील नागरिक आणि प्रशासन यांच्यातील थेट संवाद वाढविण्यासाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत निश्चित करण्यात आलेला ‘Citizen Open Day’ प्रभावीपणे राबवावा, तसेच या कालावधीत सर्व संबंधित खातेप्रमुख आणि जबाबदार अधिकारी नागरिकांसाठी कार्यालयात उपलब्ध राहावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या यापूर्वीच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना महापालिकेतील अभिलेख व दस्तऐवज पाहणीसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या कालावधीत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. महाराष्ट्र शासनानेही २६ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन निर्णय/परिपत्रकाद्वारे नागरिकांना कार्यालयीन अभिलेखांची पाहणी करण्यासाठी निश्चित वेळ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला व्यापक स्वरूप दिले आहे.

मात्र, प्रत्यक्षात अनेकदा सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत खातेप्रमुख अथवा वरिष्ठ अधिकारी बैठका, दौरे किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेता येत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. त्यामुळे ‘Open Day’ ही व्यवस्था केवळ कागदोपत्री न राहता नागरिकांना प्रत्यक्षात उपलब्ध झाली पाहिजे, अशी भूमिका आपने घेतली आहे.

“नागरिक कर भरतात आणि त्याच करातून महानगरपालिकेचा कारभार चालतो. त्यामुळे नागरिकांना भेटण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेली वेळ ही केवळ औपचारिकता राहता कामा नये. नागरिकांना अधिकारी भेटत नसतील, तर ‘Citizen Open Day’चा नेमका उद्देशच काय?” असा सवाल सुदर्शन जगदाळे यांनी उपस्थित केला.

दर सोमवारी दुपारी ३ ते ५ हा ‘Citizen Open Day’ कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवावा, या वेळेत संबंधित खातेप्रमुख व जबाबदार अधिकारी उपलब्ध राहणे बंधनकारक करावे, तसेच शक्यतो या वेळेत नियमित बैठका आयोजित करू नयेत, अशी मागणी केली आहे. अत्यावश्यक कारणास्तव अधिकारी अनुपस्थित असल्यास त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

See also  आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘पंजाब दौऱ्याचे’ विमान तिकीट भेट

प्रत्येक विभागाच्या कार्यालयाबाहेर ‘Citizen Open Day – Monday, 3 PM to 5 PM’ अशी स्पष्ट माहिती लावावी, संबंधित अधिकारी व त्यांच्या विभागाची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक करावी, तसेच अधिकारी उपस्थितीची Attendance/Visitor Register किंवा डिजिटल नोंदणी व्यवस्था सुरू करावी, असे आपने म्हटले आहे.

तसेच नागरिकांना अभिलेख पाहणी, अधिकाऱ्यांशी संवाद आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर निश्चित करावी, Open Day चे पालन होत आहे की नाही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करावी आणि आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“पुणेकरांना त्यांच्या हक्काची माहिती, अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि पारदर्शक प्रशासन मिळालेच पाहिजे. नागरिकांना प्रशासनापासून दूर ठेवण्याची पद्धत असेल तर ती बदलण्याची गरज आहे,” असे जगदाळे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन स्पष्ट आदेश काढावेत, ‘Citizen Open Day’ची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी आणि संबंधित आदेशाची प्रत सार्वजनिक करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

यावेळी आपचे धनंजय बेनकर महासचिव सुभाष कारंडे, युवा उपाध्यक्ष मिलिंद ओव्हाळ, उपाध्यक्ष संतोष काळे, कुमार धोंगडे, अरुण केदारी, शिक्षक आघाडी अध्यक्ष शितल कांडेलकर, सुनिता काळे, माधुरी गायकवाड, अविनाश भाकरे, संजय रणधीर, अक्षय वायदंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.