वारजे | प्रतिनिधी : वारजे गावठाण परिसरातील उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर तीनचाकी सहा सीटर रिक्षांचा दररोज होणारा ठिय्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रिक्षा मोठ्या संख्येने उभ्या राहून प्रवासी भरतात, ते ठिकाण वारजे वाहतूक पोलिस चौकीसमोरच असल्याने वाहतूक नियंत्रण नेमके कोण करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर सहा सीटर रिक्षा मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्याने रस्त्याची वाहतूक क्षमता कमी होते. त्यातच रिक्षाचालकांकडून रस्त्यावरच प्रवासी भरणे सुरू असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. परिणामी या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे.
सर्व्हिस रस्त्यावरील सिग्नलचा कालावधी कमी असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. सिग्नल सुटल्यानंतर वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा असणे अपेक्षित असताना समोरच्या बाजूला रस्त्यातच प्रवासी भरण्यासाठी खासगी वाहने थांबलेली असतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीत आणखी भर पडते.
दररोज अशा प्रकारे रस्त्यावर अडथळे निर्माण होत असतानाही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि रस्त्यावरच प्रवासी भरण्याचा प्रकार पोलिस चौकीच्या अगदी समोर सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कारवाई होत नसल्यामुळे काही नागरिकांकडून सहा सीटर रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये काही अर्थपूर्ण संबंध आहेत का? याबाबत चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित वाहतूक विभागाने या ठिकाणी नियमित पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
वारजे परिसरातील वाढती वाहतूक, अपुरे रस्ते आणि वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेता वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई, रिक्षांसाठी अधिकृत थांबा निश्चित करणे आणि सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वारजे वाहतूक पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली होत असेल, तर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
















