पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयालगत सुरू असलेल्या एका खासगी बांधकाम प्रकल्पासाठी ५२ जुनी व मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या निषेधार्थ ‘आप’ युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उद्यान विभागातील अधिकारी महेश गारगोटे यांना प्रतीकात्मक स्वरूपात ‘पैशांचे झाड’ भेट देत निषेध नोंदविला.
रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला. संबंधित प्रकरणात उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिल्डरच्या फायद्यासाठी झाडांची संख्या आणि वयाबाबत कागदपत्रांमध्ये फेरफार करून वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल केल्याचा आरोप ‘आप’च्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणी आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘आप’च्या निवेदनानुसार, खासगी बांधकाम प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या ५२ जुन्या वृक्षांची कत्तल करण्यासाठी झाडांचे वय व संख्या यामध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच वृक्षतोडीसंदर्भातील अधिकृत माहिती आणि कागदपत्रे देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
सदर प्रकल्पाला ज्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या (NOC) आधारे बांधकाम परवानगी देण्यात आली आहे, त्याची चौकशी करून ते रद्द करावे, अशी मागणीही ‘आप’ने केली आहे. तसेच महाराष्ट्रातील वृक्षतोडीसंदर्भातील कायदे आणि न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची भूमिका पर्यावरण संरक्षणाऐवजी बांधकाम व्यावसायिकांच्या हिताची असल्याचा आरोप करत रविराज काळे यांनी प्रशासनावर टीका केली.
रविराज काळे म्हणाले, “झाडांचे रक्षण करण्याऐवजी महापालिका अधिकारी बिल्डरांच्या फायद्यासाठी जुन्या वृक्षांचा बळी देत असल्याचा आरोप आहे. ५२ झाडांची कत्तल हा पर्यावरणासाठी गंभीर प्रकार आहे. या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण शहरात महापालिकेविरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल.”
या आंदोलनावेळी आम आदमी पार्टी व युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, युवक शहराध्यक्ष विकी पासोटे, योगेश गायकवाड यांच्यासह पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















