पुणे : Pune Junction Railway Station येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूला सकाळपासून एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीच्या डोक्यातून रक्त वाहत असून तो जागीच मृत झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दिवसभर मृतदेह तसाच पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती पोलीस आणि ॲम्बुलन्स प्रशासनाला देण्यात आली. मात्र अनेक तास उलटूनही कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेल्वे स्टेशनसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अशी गंभीर घटना घडूनही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दररोज हजारो प्रवासी ये-जा करणाऱ्या पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मृतदेह तसाच पडून राहिल्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “मृत व्यक्ती कोण आहे, मृत्यू नेमका कसा झाला, याची चौकशी तातडीने व्हावी तसेच मृतदेह त्वरित ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करावी,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.














