‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातील आरोग्य शिबिरास सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची भेट

पुणे : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत भोसलेनगर, हडपसर येथील युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शिबिरातील नागरिकांशी संवाद साधून आरोग्य सुविधांची माहिती घेतली.

श्री. कोथळीकर यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन शिबिरात उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य तपासणी सुविधांची माहिती घेतली. तसेच गणेश मंडळाचे स्वयंसेवक व सोसायटी सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वतः हिमोग्लोबिनची तपासणी करून घेत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.

शिबिरास सुमारे २५० सोसायटी सदस्य व गणेश मंडळाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी श्री. कोथळीकर यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. “उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असून, नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते,” असे त्यांनी सांगितले.

या आरोग्य शिबिरात एकूण ३५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात सर्वरोग निदान, हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, रक्ताच्या तपासण्या, डोळ्यांची तपासणी, दंतरोग तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी तसेच रक्तदान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, पुणे येथील अधीक्षक अभिजीत अनाप, जिल्हा न्यायाधीश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सागरराजे भोसले, वंशराजे भोसले, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक समर्थ सुरवसे आणि सामाजिक कार्यकर्ते अमित जागडे उपस्थित होते.

‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचे नेतृत्व कक्षप्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात अभियानाचे नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे, अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेत आरोग्य तपासणी व जनजागृतीच्या माध्यमातून योगदान दिले.

See also  पीसीयू आयोजित मराठी उद्योजकांच्या जागतिक परिषदेचे दुबई येथे उद्धघाटन