माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी सरकार कटिबद्ध! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यास प्रमुख उपस्थिती दर्शवली, यावेळी त्यांनी वडाळा माथाडी घरकुल प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा केली, तसेच गुणवंत कामगारांना पुरस्कार वितरित केले.

माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे 3000 माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडली. तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी, असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या त्यागाला जाते.

माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे. हा कायदा संपवला जाईल, असा संभ्रम काही घटकांकडून निर्माण केला जात असला तरी सरकार हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही. मात्र, या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील.

See also  रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, 2850 ते 3000 माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.

वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय सरकार उपलब्ध करून देईल. या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल.माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत.

माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत.

See also  वाडेश्वर कट्ट्यावर रंगला राजकीय फराळ

यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.