पुणे : गणेशोत्सव २०२६ दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गणेशमूर्ती विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी व्यापक नियोजन करण्यात आले होते. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी नदी, तलाव आदी ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन सुविधांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ३८ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय ३५ ठिकाणी लोखंडी टाक्या तसेच २२४ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. शाडू मातीच्या मूर्ती व गणेशमूर्ती संकलनासाठीही ४५ ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात आली होती.
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महापालिकेने आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम तसेच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी वाघोली येथील खाणीची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी आवश्यक नियोजन करून १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यात आले.
महापालिकेच्या अहवालानुसार, १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बांधलेल्या हौदांमध्ये १,०९,४७९ गणेशमूर्ती, तर लोखंडी टाक्यांमध्ये ३,९४,३४९ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तसेच १,७३,२२९ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६,७७,०५७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.या कालावधीत तब्बल ७,१५,०५९ किलो निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
९ लाख किलोहून अधिक कचरा संकलित
गणेशोत्सव काळात १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण ९,१८,५३७ किलो कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये ५,४६,३५४ किलो ओला कचरा, ३,७२,१८४ किलो सुका कचरा, १८,९१० किलो डेकोरेशन साहित्य आणि २,१५३ किलो चपला/बूट यांचा समावेश आहे. या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, नदीघाट, विसर्जन हौद तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात स्वच्छता करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयांमार्फत करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांची स्वच्छता राखण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या या आकडेवारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती विसर्जन, निर्माल्य संकलन आणि कचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील व्यवस्थेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
















