गणेशोत्सवानंतर ४८ तासांत मांडव, फ्लेक्स, रथ हटवा; क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांचे महापालिका व पोलिस प्रशासनाला निवेदन

पुणे : गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पुणे महापालिका प्रशासन आणि पुणे पोलिसांचे अभिनंदन करत, उत्सवानंतर शहरातील रस्त्यांवरील मांडव, फ्लेक्स, कमानी, स्वागत कक्ष तसेच मिरवणुकीतील रथ, ट्रॅक्टर-ट्रॉली व गाडे पुढील ४८ तासांत हटविण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात खर्डेकर यांनी म्हटले आहे की, काही त्रुटी राहिल्या असल्या तरी गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. यासाठी पुणे पोलिस दल तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल पुणेकरांच्या वतीने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मात्र, उत्सवानंतरची व्यवस्था तातडीने पूर्वपदावर आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या अनुभवानुसार गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर उभारण्यात आलेले मांडव, मिरवणुकीतील रथ, ट्रॅक्टर-ट्रॉली, गाडे, कमानी आणि स्वागत कक्ष अनेक दिवस तसेच राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

शहरातील सर्व रस्ते पुढील ४८ तासांत सुरळीत वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने लावण्यात आलेले फ्लेक्स तातडीने हटवावेत. काही ठिकाणी फ्लेक्समुळे वाहतूक सिग्नल झाकले गेल्याचेही निदर्शनास येत असल्याने त्यावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडल्यानंतर शहराची वाहतूक व्यवस्था आणि रस्ते पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई करावी, अशी अपेक्षा संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.

See also  परिवर्तनासाठीची सुरुवात स्वतःपासून करा-  पोलीस उपायुक्त सोमय मुंडे