पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी २.०)’ची प्रभावी अंमलबजावणी करून गरजू नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महापालिकेने राबविलेल्या एएचपी-पीपीपी मॉडेलचा अभ्यास करण्यात येत आहे. यासंदर्भात नागपूर महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील उइके आणि प्रकल्प अभियंता प्रतीक गजभिये यांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयात अभियांत्रिकी विभाग तसेच ‘पीएम आवास योजना सेल’समोर सविस्तर सादरीकरण केले.
नागपूर महापालिकेने राबविलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची कार्यपद्धती, प्रमाणित कार्यपद्धती (SOP), प्रत्यक्ष अनुभव तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबींची माहिती यावेळी देण्यात आली. पुणे महानगर प्रदेशातील नियोजनासाठी नागपूरच्या या अनुभवाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने हे सादरीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीत १ ते २ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी २.०) अंतर्गत नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची शक्यता तपासण्यात येत आहे. नागपूरमध्ये राबविण्यात आलेल्या मॉडेलचा अभ्यास करून पुणे महानगर प्रदेशातील स्थानिक परिस्थितीनुसार त्याची अंमलबजावणी करता येईल का, याबाबत नियोजन सुरू आहे.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (भा.प्र.से.) यांनी पुणे महानगर प्रदेशातील प्रत्येक तालुक्यात या योजनेअंतर्गत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार खेड, मुळशी, मावळ, शिरूर, दौंड यांसह पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विविध तालुक्यांमध्ये गरजू नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्यात येणार आहे.
या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी (भा.प्र.से.), मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, उपअभियंता शंकर कोळेकर, उपअभियंता विक्रम मुरडे यांच्यासह नागपूर महापालिका, पीएमआरडीए आणि सल्लागार संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
















