औंध क्षेत्रीय कार्यालयातील विजेच्या अपव्ययावर थांबवा- ऋषिकेश कानवटे ‘आप’ची मागणी

औंध : औंध क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असतानाही सर्व फॅन आणि लाईट्स विनाकारण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकारावर आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
कामानिमित्त औंध क्षेत्रीय कार्यालयात गेले असता आरोग्य विभागामध्ये एकही अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हता. तरीही संपूर्ण विभागातील लाईट्स आणि फॅन चालू ठेवण्यात आले होते.

यावर बोलताना ऋषिकेश कानवटे म्हणाले, “सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारे विजेचा आणि जनतेच्या पैशांचा उघडउघड अपव्यय होणे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे. या वीजबिलाचे पैसे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या खिशातून जात नसून, सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या कष्टाच्या पैशांतून जातात.”पुढे बोलताना त्यांनी मागणी केली की, सरकारी मालमत्ता आणि जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी तात्काळ थांबली पाहिजे. संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विजेची बचत करण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात यावी.

हा प्रशासकीय हलगर्जीपणा त्वरित न थांबल्यास आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ऋषिकेश कानवटे यांनी दिला आहे.

See also  आयटी क्षेत्राला हवा शिकलेला, दूरदृष्टीचा माणूस – जयेश मुरकुटेंना सुशिक्षित मतदारांची पसंती