धार्मिक मानचिन्हांचे दर्शनही अयोध्येतील राम मंदिरात घडते- कलाकार चंद्रशेखर कुलकर्णी

पुणे – भारतीय संस्कृतीमधील धार्मिक मानचिन्हे अयोध्येतील श्रीराम मंदिरात साकारली आहेत. ही मानचिन्हे आणि राम लल्लाची निरागस मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटते, असा अनुभव आरूषी क्रिएशन चे क्रिएटीव्ह हेड चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितला.

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चित्रिकरणाचे काम श्रीराम जन्मभूमी न्यासाने आरूषी क्रिएशनला दिले होते. त्या सोहळ्यातील चित्रिकरणादरम्यान आलेले अनुभव कुलकर्णी यांनी ‘राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा’ या विषयावर व्याख्यान देताना सांगितले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्यावतीने श्री संत तुकाराम बीज ते श्री संत एकनाथ षष्ठी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा प्रारंभ श्री.कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी व्यासपीठावर कार्याध्यक्ष जयंत देशपांडे आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रदीर्घ तपस्या आणि समर्पण भाव याचे चित्रिकरण करण्याची संधी मिळाली, असे मनोगत श्री कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने एकदा तरी अयोध्येतील श्रीराम लल्लाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कारसेवक किरण देशपांडे, प्रसाद खेडेकर, नितीन तारे आणि दिवंगत कारसेवक महेश देशपांडे यांच्या पत्नी वैशाली देशपांडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल पानसे यांनी केले, नितीन तारे यांनी आभार मानले.

See also  ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : मुरलीधर मोहोळ