जयराम गृहरचना संस्था एसआरए प्रकल्पाबाबत रहिवाशांची माजी आमदार धंगेकरांकडे धाव; प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून न्याय मिळवून देण्याची मागणी; १४ ऑक्टोबरला पाहणी

कोथरूड : कोथरूड येथील सर्वे नंबर ४४ मधील जयराम सहकारी गृह रचना संस्था मर्यादित आणि वसंत नगर सहकारी संस्था परिसरातील एसआरए प्रकल्पाबाबत रहिवाशांनी गंभीर आक्षेप नोंदवत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. प्रकल्पाला मोठ्या संख्येने रहिवाशांचा विरोध असल्याचा दावा करत आमदारांनी स्वतः परिसराची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संस्थेला १ सप्टेंबर १९७७ पासून धर्मादाय आयुक्तांकडून जमिनीचे मालकी हक्क प्राप्त आहेत. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबविण्याबाबत दबाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्याचेही रहिवाशांनी सांगितले.

२०१० मध्ये या प्रकल्पाच्या विरोधात सुमारे चार हजार नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ७० टक्के रहिवाशांची संमती नसल्यास प्रकल्प थांबविण्याबाबत आश्वासन मिळाले होते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, २०२४ मध्ये प्रकल्पाचा आराखडा मंजूर करण्यात आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.माहितीच्या अधिकारातून एसआरएच्या प्रस्ताव, सहकार, ताबा आणि नगररचना विभागांकडे प्रकल्पासंदर्भातील आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर मिळाल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. संस्थेतील सुमारे ७५ टक्के रहिवासी प्रकल्पाच्या विरोधात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच बिल्डरच्या प्रतिनिधींकडून काही रहिवाशांना प्रलोभने देणे, कथित खोटे रहिवासी पुरावे पात्र-अपात्र यादीत समाविष्ट करणे आणि जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप रहिवाशांनी केले आहेत. या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर हे १४ ऑक्टोबर रोजी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले. पाहणीनंतर संबंधित प्रकरण नगरविकास विभागाचे मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी वत्सला कानगुडे, जानाबाई तोंडे, विमलबाई चव्हाण, शकुंतला दबडे, सखूबाई दबडे, जनाबाई चव्हाण, मंगल वांजळे, संगीता भोसले, योगिता निवंगुणे (तोंडे), आशा राजेंद्र भगत, लता कुडले, मोनाली काळभोर, सचिन यादव, निकुंज उभे, अण्णा शिंदे, गणेश सोनार, गणेश वांजळे, अमर टकले, अभिजीत मोरे, शंकर ठाकर, विष्णू रानवडे, अनिल कानगुडे, स्वप्नील भोसले, राहुल पळस्कर, दीपक कुढले, ऋषिकेश भरेकर, बाळासाहेब सातपुते, समीर निवगुणे, गणेश मोहन मारणे, आदित्य उभे, राहुल भरम, शमिम हाशमी, तेजस भगत, राहुल वांजळे, विजय सादबा उभे, गणेश मोहळ, दीपक भाऊ खरसडे आदींसह सोसायटीचे सभासद व रहिवासी उपस्थित होते.

See also  पासपोर्ट सेवा दिवस उत्साहात साजरा; नागरिक-केंद्रित सेवांप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार