४३ कोटींची पाणीपुरवठा योजना होऊनही मांजरी बुद्रुक तहानलेलेच; पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन चार वर्षे उलटली, तसेच ४३ कोटी रुपयांची पेयजल योजना राबविण्यात आली, तरीही मांजरी बुद्रुक परिसरातील पाणीटंचाई कायम आहे. महादेवनगरसह गावातील विविध भागांना अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवीण रणदिवे यांनी दिला आहे.

यासंदर्भात रणदिवे यांनी पुणे महानगरपालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी संतोष ढोरे, गणेश घुले, दीपक राखपसरे, गणेश मरळ, करण राखपसरे, अमोल साळुंखे आदी उपस्थित होते.

मांजरी बुद्रुकचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वीपासूनच महादेवनगर परिसरात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. मात्र, सध्या उपलब्ध होणारे पाणीही अपुरे आणि अनियमित असल्याचे रणदिवे यांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका, पाणीपुरवठा विभाग, लष्कर पाणीपुरवठा केंद्र आणि तत्कालीन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही.

जलवाहिन्या टाकताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष, वितरण व्यवस्थेतील तांत्रिक दोष आणि पाणी सोडताना होणारा दुजाभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी प्रभावशाली व्यक्तींच्या दबावामुळे मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या, तर सामान्य नागरिकांच्या वस्त्यांमध्ये कमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्याने पाणीवितरणात असमानता निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, तत्कालीन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४३ कोटी रुपयांच्या पेयजल योजनेचे भूमिपूजन ज्या रेल्वेगेट परिसरात करण्यात आले, तोच परिसर आजही पाणीपुरवठ्यापासून वंचित असल्याकडे रणदिवे यांनी लक्ष वेधले आहे. २००८ मधील लोकसंख्या गृहीत धरून २०१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम २०२४ अखेर काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले. मात्र, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेतली नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. या ४३ कोटी रुपयांच्या योजनेवर प्रत्यक्षात किती खर्च झाला, किती काम पूर्ण झाले आणि कोणत्या स्वरूपाची कामे करण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

See also  हिंदू विरशैव लिंगायत समाजाचा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा; पाषाण बाणेर सुतारवाडी परिसरात बाईक रॅलीद्वारे प्रचार

मांजरी बुद्रुक परिसराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता नवीन पाच ते सहा पाण्याच्या टाक्या उभाराव्यात, आवश्यक जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करावे आणि संपूर्ण योजनेचा सुधारित आराखडा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तत्कालीन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यावेळी सुधारित आराखडा तयार करून लवकरच मांजरी बुद्रुक परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड ते दोन वर्षे उलटूनही त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे.

महापालिका प्रशासनाने आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी आणि मांजरी बुद्रुकमधील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रणदिवे यांनी दिला आहे.