पुणे : मुलांनी इंजिनिअर व्हावे, उज्ज्वल भविष्य घडवावे, या स्वप्नासाठी शेतकरी, कष्टकरी आणि नोकरदार पालकांनी प्रसंगी जमिनी विकून, कर्ज काढून आणि पोटाला चिमटा घेऊन लाखो रुपयांची फी भरली. मात्र, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SITS), नऱ्हे कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊन दोन महिने उलटूनही लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स सुरू नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ ‘SITS नऱ्हे पालक संघर्ष समिती’च्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयावर (DTE) धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
संस्थेतील शैक्षणिक कामकाज पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांना समितीने पहिले लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा भेट घेऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती मांडण्यात आली. संस्थेला काही अडचणी असून लवकरच सर्व सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
यानंतर पालक समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेतली. विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत २४ तासांच्या आत संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न करूनही पालक समितीला भेट मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.
पालकांनी लाखो रुपये खर्च करून मुलांना प्रवेश मिळवून दिला. मात्र, कॉलेजचे अधिकृत हॉस्टेल बंद असल्याने अनेकांना खासगी हॉस्टेल, खोल्या आणि मेससाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. दोन महिने शुल्क भरूनही शिक्षण मिळत नसल्याने पालक आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहेत. “एवढा पैसा खर्च करूनही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसेल, तर पालकांनी न्याय कोणाकडे मागायचा? या परिस्थितीतून एखाद्या हवालदिल पालकाने किंवा विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची जबाबदारी सरकार, उच्च शिक्षण विभाग आणि सीईटी सेलने स्वीकारावी,” असा संतप्त इशारा समितीचे प्रतिनिधी प्रशांत कांबळे यांनी दिला.
आंदोलनानंतर पालक संघर्ष समितीने तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. सुरेश आ. पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये SITS नऱ्हे कॅम्पसमधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांना सक्षम शासकीय अथवा मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये तातडीने स्थलांतरित करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यापूर्वी पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या घराजवळील आणि सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश द्यावा. स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियमित लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स ऑफलाइन पद्धतीने पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावेत. तसेच पालकांकडून आकारलेली शैक्षणिक व हॉस्टेल फी व्याजासह परत करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.निवेदन स्वीकारताना सहसंचालक स्मिता गाडे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही आणि मागण्यांबाबत तातडीने आवश्यक शासकीय पावले उचलली जातील, असे लेखी आश्वासन दिल्याचे समितीने सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास मंत्रालयासमोर तसेच तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालक संघर्ष समितीने दिला.
या आंदोलनात समितीचे सदस्य नामदेव तौर, राजेंद्र बल्लाळ, किशोर मोहिते, सुनील बोरगे, रमेश गायकवाड, अंजली ठोंबरे, रेणुका यादव, संजय गाडेकर, वैभव जावहिरे, शिवाजी ठोबरे, संपतराव घोरपडे, नारायण खळकर, संतोष पवार, शंकरराव होणराव, राजेंद्र काळे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.















