पुणे पुरवठा विभागातील उत्कृष्ट कामाचे राज्यभर अनुकरण व्हावे- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

पुणे : रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करुन देण्याच्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी) उपक्रमात पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असून ४ हजार ५०० दुकानांची कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधेसाठी नोंदणी केली आहे. हे काम उत्कृष्ट असून असेच काम पुरवठा विभागामार्फत संपूर्ण राज्यभर व्हावे, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

शासकीय विश्रामगृहात पुरवठा विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी अन्न व पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे, पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी, वैधमापनशास्त्र विभागाच्या सहनियंत्रक सीमा वैद्य आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, विभागाने ९२ टक्के आनंदाचा शिधा वाटप केला आहे, ही चांगली बाब आहे. आनंदाचा शिधा लवकरात लवकर १०० टक्के वाटप होईल यासाठी तातडीने कार्यवाही करावी. इष्टांकपूर्तीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योजना तयार करुन गरजू व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल यावर लक्ष द्यावे, असे सांगून ई वितरण प्रणाली सुरु करण्यासाठी लागणारे संगणक उपलब्ध करुन दिले जातील तसेच पुरवठा विभागाचा आकृतिबंद सुधारित करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

श्री. चव्हाण म्हणाले, वैधमापन विभागाने ग्राहकांचे नुकसान होणार नाही यासाठी मोहीम स्तरावर बाजारातील वस्तूंचे मोजमाप घेऊन ते बरोबर असल्याची खात्री करावी. त्रुटी असलेल्या प्रकरणात कारवाई करावी. वैधमापन कार्यालयाच्या वाढीव जागेसंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करावा, असेही ते म्हणाले.

बैठकीत अन्नधान्य नियतन उचल वाटप, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आनंदाचा शिधा, धान खरेदी व भरडाईबाबतचा अहवाल, शिधापत्रिका योजना निहाय माहिती, तांदुळ वितरणाबाबतची जिल्हानिहाय माहिती, शिवभोजन योजना २०२२, अन्नधान्य साखळी वितरण, ई- वितरण प्रणाली, पोस्टल बँक, गुगल मॅपिंग, नोगा प्रॉडक्ट्स आदीबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सादरीकरणाद्वारे विभागात राबविण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. पुरवठा विभागाने तयार केलेल्या गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

See also  जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

बैठकीला पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते.