राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पुणे विभागाला वैयक्तिक गटात प्रथम व तृतीय क्रमांक

पुणे : शालेय खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, या उद्देशाने आयोजित सन २०२६-२७ मधील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत (१७ वर्षांखालील मुली) पुणे विभागाने वैयक्तिक गटात प्रथम व तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने ही स्पर्धा १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र रेसलिंग सेंटर असोसिएशन व रेसलिंग कोर्ट, एन.आय.बी.एम. रस्ता, उंड्री, पुणे येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतील ३४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उद्घाटन खुले कारागृह, येरवडा, पुणे येथील अधीक्षक रामकांत शेजडे यांच्या हस्ते करण्यात आले. शेजडे हे स्वतः बॉक्सिंग या खेळाचे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. यावेळी त्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक व चांगल्या दर्जाचे कुस्ती मैदान पाहून समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रात अशा सुविधा विविध ठिकाणी निर्माण झाल्यास राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा विश्वास व्यक्त करुन राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळविण्यासाठी खेळाडूंना अशा सुविधांचा निश्चितच लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगनाथ लकडे, उद्योजक नकल चव्हाण, महाराष्ट्र रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांदरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी यांनी केले, तर आभार मनोज धिवार यांनी मानले. स्पर्धा पंच म्हणून सतीश पोतदार, आर्यन पोतदार, हिमतसिंग भाटी, खुमान सिंग भाटी, चेझीन आणि निर्मलसिंग यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेते :
वैयक्तिक गट :
– प्रथम – आरवी रैना, पुणे विभाग
– द्वितीय – महिका सुब्रमण्यम, मुंबई विभाग
– तृतीय – देवकी आनंद, पुणे विभाग
– चतुर्थ – आराध्या वराडे, छत्रपती संभाजीनगर विभाग
– पाचवा – निर्वी काबरा, पुणे विभाग

सांघिक गट :
प्रथम – पुणे विभाग, द्वितीय – नाशिक विभाग, तृतीय – लातूर व कोल्हापूर विभाग. या स्पर्धेत प्राविण्य मिळविणारे खेळाडू उदयपूर (राजस्थान) येथे १ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण