पिंपरी-चिंचवड: प्रभाग क्रमांक १९ च्या विद्यमान नगरसेविका सविता धनराज आसवानी यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि मंजूर नकाशाचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर आरोप अमित म्हस्के यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करावे आणि अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अमित म्हस्के यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नेमके प्रकरण काय?
मौजे पिंपळे निलख, विशालनगर येथील सर्व्हे क्र. २६/१/१+२/१/१ मधील शॉप क्र. १ येथे नगरसेविका सविता आसवानी यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम केले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने यापूर्वीच नोटीस बजावल्या आहेत. मात्र, अद्याप त्यावर ठोस कारवाई झालेली नाही.
कायदेशीर तरतूद आणि आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड) अन्वये, कोणत्याही लोकप्रतिनिधीने स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अनधिकृत बांधकाम केल्यास ते नगरसेवक पदासाठी अपात्र ठरतात. जनतेच्या हिताचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच नियमांची पायमल्ली होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे श्री. अमित म्हस्के यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणी आम आदमी पार्टीने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत. संबंधित ठिकाणाची तात्काळ स्थळपाहणी व मोजमाप करून अनधिकृत बांधकामाचा पंचनामा करावा. सदर बेकायदेशीर बांधकामावर नियमानुसार तात्काळ निष्कासनाची कारवाई करावी.अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सविता आसवानी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करावी. या निवेदनासोबत अनधिकृत बांधकामाचे छायाचित्रे आणि महापालिकेने पाठवलेल्या नोटिसीचे पुरावे जोडण्यात आले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई न केल्यास, आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमित म्हस्के यांनी दिला आहे.
















