भाजपा देवाचा व धर्माचा सत्तेसाठी वापर करतो – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि देवाच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या संघटना यातील फरक पंतप्रधानांना कळत नाही हे देशाचे दुर्भाग्य असल्याचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

बजरंगबलीचे भक्त आम्हीही आहोत, त्याची उपासनाही करतो पण त्याचा सार्वजनिक दिखावा करत नाही. धर्माच्या नावाने जनतेला लुटणाऱ्या संघटना नसाव्यात परंतु काही लोक धर्माच्या नावाने लुटत आहेत.

देवाच्या नावाने लुटपाट करणारी व्यवस्था कोणत्याही धर्मात असेल तर त्या व्यवस्थेत बदल झाला पाहिजे तरच लोकांचा धर्मावरचा विश्वास वाढेल. भाजपाकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही म्हणून ते नेहमीप्रमाणे धर्माच्या नावावर फुट पाडून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु कर्नाटकची जनता भाजपाचा हा कुटील हेतू जाणून आहे असे नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपाला राम, हनुमान किंवा कोणत्याही देवाबद्दल प्रेम नाही, भाजपा देवाचा व धर्माचा फक्त सत्तेसाठी वापर करतो. बजरंग दलाच्यावरुन आरडाओरड करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर सरकारनेच गोव्यात श्रीराम सेनेवर बंदी घातली होती, त्यावेळी रामाचा अपमान झाला असे वाटले नाही का? त्यामुळे भाजपासाठी देव हे फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच आहेत त्यांचे हे ढोंग जनतेला माहित आहे, भाजपाच्या या कांगाव्याला कोणी फसणार नाही असे काँग्रेसचे नाना पटोले यांनी व्यक्त केले.

See also  पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार