आरोग्यसेवा हीच खरी मानवसेवा कार्यसम्राट माजी आमदार स्व.विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख

आरोग्यसेवा हीच खरी मानवसेवा

आपण असे श्रद्धेने मानतो कि प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा वास असतो.त्यामुळे मानवी शरीराची सेवा हीच खरी भगवत सेवा आहे असे सगळेच धर्म सांगतात. याच शरीराला झालेल्या दुर्धर आजारांपासून मुक्ती मिळवण्याचे सामर्थ्य गरजू रुग्णांना कुणी दिले तर ती किती मोठी सेवा ठरेल? असे कार्य निश्चितच मानवतेच्या धर्माचे खरे आचरण ठरेल. अशाच कार्याला आपल्या जीवनाचे खरे ध्येय मानून काही विभूतींनी आपले आयुष्य वेचले. त्यात पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार कै.विनायक (आबा) निम्हण यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

मानवसेवा आणि गरजुंना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य हेच स्व. आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जीवनाचे ब्रीद होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हे ब्रीद अत्यंत निष्ठेने पाळले. आपल्या हयातीत त्यांनी सातत्याने आरोग्य शिबीरांचे आयोजन केले होते. त्यात अनेक गरजुंना मोफत उपचार, औषधे, चष्मे आणि आरोग्य साहित्याचे मोफत वाटप केले. शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी पुण्यातील ससून आणि औंध जिल्हा रुग्णालयांमध्ये आधुनिक सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून विधिमंडळात आवाज उठवला आणि शासन दरबारी पाठपुरावा करून त्या उपलब्ध करून घेतल्या. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे आधुनिकीकरण झाले आणि तिथे आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. आजार आणि त्याच्या उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे सर्वसामान्य लोक आर्थिक विवंचनेत सापडतात. अनेक लोक खर्च न झेपल्यामुळे आजार अंगावर काढतात. घरातील कर्त्या माणसाला आजार झाला तर सगळं कुटुंब कोलमडून पडते अशी अनेक उदाहरणं आबांनी बघितली होती. त्यामुळेच गरजूना मोफत आरोग्य सेवा देण्यावर त्यांचा विशेष भर असायचा. ते आमदार असताना महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी योजनेतून मोफत इलाज मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या हि पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक होती यातच आबांचा ध्यास दिसून येतो.

आज आबा आपल्यात नाहीत. येत्या ५ ऑगस्ट रोजी त्यांची पहिली जयंती आहे. या निमित्ताने आबांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या आरोग्य शिबीराच्या कार्याला एक व्यापक आणि विराट स्वरूप द्यावे असा निर्धार त्यांचा मुलगा सनी विनायक निम्हण , आमचे सोमेश्वर फाऊंडेशन आणि असंख्य आबाप्रेमींनी केला. संकल्पना सांगताच मुंबई व पुण्यातील जगविख्यात डॉक्टरांनी मोफत सेवा देऊ म्हणून सांगितले. पुण्यातील अनेक नामांकित हॉस्पिटल्सने या शिबीरात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. हा प्रतिसाद मिळताच सर्वानी ठरवले आणि आता येत्या ६ ऑगस्ट रोजी पुण्यात सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर एक भव्यदिव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात जवळपास ८०००० घरात भेटी देऊन रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील २४ ठिकाणी  एमआरआय, सिटी स्कॅन, ईसीजी, अँजिओग्राफी, रक्त तपासण्या आदी सर्व चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात मुख्य शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यकता भासल्यास  शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. या महा आरोग्य शिबीरात उपचारापासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्वकाही मोफत करण्यात येणार आहे. पैशाअभावी महागड्या चाचण्या, शस्त्रक्रिया व उपचार न घेऊ शकणाऱ्या रुग्णांसाठी हि मोठी पर्वणी असणार आहे. आबांचा आरोग्य सेवेविषयीचा जो ध्यास होता त्याला एवढे विशाल आणि व्यापक स्वरूप मिळावे यापेक्षा मोठी श्रद्धांजली दुसरी काय असू शकते? सनीदादा , आमचे सोमेश्वर फाऊंडेशन आणि आबाप्रेमींचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. हे शिबीर सुरळीत पार पडो आणि यातून नरनारायणाची आरोग्य सेवा घडो हीच सदिच्छा आणि सनीने जो आबांचा रुग्णसेवेचा संकल्प हाती घेतला आहे त्याला मनापासून शुभेच्छा!

  • बिपीन मोदी
    प्रबोधन मंच
    ( लेखक हे सामाजिक कार्यकर्ते असुन कै. विनायकजी ( आबा ) निम्हण यांचे घनिष्ठ स्नेही आहेत. )
See also  डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार