
मुंबई : आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य कमिटी व विभागीय कमिटी या बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.
नुकत्यातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पावले उचलत पूर्णतः नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आपचे राष्ट्रीय सचिव खासदार डॉक्टर संदीप पाठक यांनी आज तशी घोषणा केली आहे. तसेच थेट राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात नव्याने कमिटी तयार करण्यात येतील असे या पत्रकात म्हटले आहे.
दिल्ली, पंजाब, गुजरात नंतर अनेक राज्यात पसरण्याचा आम आदमी पार्टी चा प्रयत्न असून महाराष्ट्रातही आप ला मोठी संधी आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे आता आप च्या पुढच्या वाटचालीकडे सर्व पक्षांचे लक्ष आहे.
‘ आम आदमी पार्टी महाराष्ट्रात तळागाळापर्यंत एक मजबूत आणि सशक्त संघटना बांधणी करणार आहे म्हणून आज हे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या लोकांना समाविष्ट करून एक सशक्त राज्य समिती बनवण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक वस्तीत, गावात आणि बूथ पातळी पर्यंत आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांचे जाळे उभारले जाईल. हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्रातील बदलणाऱ्या राजकारणात आप वेगाने पुढे वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बुद्धिवान, सामाजिक व राजकीय लोकांना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल. ‘ असे आप चे राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया यांनी म्हंटले आहे.