मिठाई विक्रेते व नागरिक यांना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

पुणे : प्रत्येक नागरिकास सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांनी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहिम हाती घेतली असून सणासुदीच्या पार्श्वभुमीवर मिठाई विक्रेते व नागरिक यांनी काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

अन्न व्यावसायिकांनी मिठाईच्या ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य मुदत (युज बाय डेट) नमूद करावी. अन्नपदार्थ व खवा हा परवानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावा. घेतलेल्या अन्नपदार्थाची खरेदी बिले आपल्याकडे ठेवावी. प्रत्येक अन्न व्यावसायिकाने त्याच्या विक्री देयकावर अन्न सुरक्षा मानद कायदा, २००६ अंतर्गत प्राप्त परवाना, नोंदणी क्रमांक नमुद करणे अनिवार्य आहे. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.

अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावेत. कामगाराची त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्ततेबाबतची वैद्यकीय तपासणी करावी. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा १०० पीपीएमच्या आतच वापर करावा. बंगाली मिठाई ही ८-१० तासाच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे.

ग्राहकांनीही फक्त नोंदणी, परवानाधारक आस्थापनाकडून मिठाई, दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करावी. मिठाई, दूध, दुग्धजन्यपदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करताना युज बाय डेट पाहूनच खरेदी करावी. उघड्यावरील तसेच फेरीवाल्याकडून मिठाई, खावा (मावा) खरेदी करु नये. माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासाच्या आत करावे तसेच त्यांची साठवूणक योग्य तापमानात (फ्रीजमध्ये) करावी. बंगाली मिठाई ८-१० तासाच्या आत सेवन करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये. खराब, चवीत फरक जाणवला तर सदर मिठाई नष्ट करण्यात यावी.

प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. ही मोहीम ही दिवाळीपर्यंत अशीच चालू राहणार असून व्यावसायिक व ग्राहकांनी अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

See also  आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन