कोल्हेवाडी, किरकिटवाडी परिसरातील  खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

खडकवासला : अनेक वर्षांपासून रखडलेल्या खडकवासल्यातील  कोल्हेवाडी  व किरकटवाडी या गावांच्या अरुंद असलेल्या शीव रस्त्याचे काम पालिका प्रशासनाने  पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करता पावसाळा तोंडावर आलेला असूनही सुरू केले खरे परंतु नियोजनाअभावी नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. शिवरस्त्याने डोंगर उतारावरील वाहत आलेले पाणी रस्त्याच्या कामासाठी खोल खोदलेल्या खड्ड्यात येऊन साचत असल्याने वाहतुकीस धोकादायक झाले असून अपघात होउन जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ठेकेदाराला पाठीशी घालत पालिका दुर्लक्ष करत असून पोलीस प्रशासन मात्र कोठेही दिसत नाही.

अगोदरच अरुंद असलेला शीवरस्ता अर्धा खोदल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पर्यायी रस्ता नसल्याने याच खोदलेल्या रस्त्याच्या कडेने वाहतूक सुरू आहे. खोदकामही इतके खोल करण्यात आले आहे की एखाद्या वाहनचालकाचा तोल गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो. लोकवस्ती जास्त असल्याने सकाळी व संध्याकाळी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व त्याचा परिणाम मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीवर होताना दिसत आहे.


सीडब्ल्यूपीआरएस गेट समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात असणे आवश्यक आहे मात्र तशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच पालिका प्रशासनानेही रस्त्याच्या खोदकामामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. पावसाळा तोंडावर आलेला असताना करण्यात आलेले हे खोदकाम आणि कासवालाही लाजवेल अशा गतीने सुरू असलेले काम हे नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.


सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.
कॉंक्रीटचा रस्ता करण्यासाठी कमितकमी दोन महिन्याचा कालावधी लागतो. 15 मे नंतर रस्ते खोदण्यास आयुक्तांचा मनाई आदेश  असूनही अगोदरच अरुंद  असलेल्या कोल्हेवाडी शिव रस्त्याचे काम राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावातून ठेकेदारांना पोसण्यासाठी सूरू करण्यात आले. मुसळधार पावसात निकृष्ठ होणाऱ्या कामाची  जबाबदारी कोणाची हे आयुक्तांनी स्पष्ट करावे.

See also  पाषाणकर दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन