निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

पुणे : जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यांची त्वरीत स्वच्छता करण्यात आली.

देहू परिसराची झाडलोट व स्वच्छता करून कचरा संकलित करण्यात आला आणि कचऱ्याचे उचित व्यवस्थापन करण्यात आले. अन्नपदार्थ, पत्रावळी अशा स्वरुपाचा १४ टन ओला कचरा व इतर कचरा, तसेच ६५० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मुक्काम विसावा निवारा व रस्त्याच्याकडील कचरा तसेच परिसरातील स्वच्छता करून गाव स्वच्छ सुंदर व निर्मल ठेवण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा परिषद पुणे मार्फत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रत्येकी २०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा पुढे गेल्यावर स्वचछता करण्यासाठी २५० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मुक्काम, विसावा, निवारा व रस्त्याच्या कडेलाही स्वच्छतेसाठी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी मुक्कामच्या एक दिवस अगोदर कचराकुंडी उभारण्यात येणार असून पालखी प्रस्थान झाल्यानंतर तात्काळ परिसरातील झाडलोट करून घनकचरा प्रकल्प केंद्र ठिकाणी प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे, अशी माहिती श्री.वाघमारे यांनी दिली आहे.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी