वनमहोत्सवादरम्यान सामाजिक वनीकरण विभागातर्फे सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा

पुणे : वन महोत्सव कालावधी १५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान नागरिकांना वृक्षलागवडीसाठी उद्युक्त करण्याच्यादृष्टीने वन विभागातर्फे सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक विजय भिसे यांनी दिली आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात वनमहोत्सवाच्या कालावधीत ९ महिन्याचे प्रती रोप अ प्रतवारी २० रुपये, ब प्रतवारी १२ रुपये तर क प्रतवारी १० रुपये असा विक्रीचा दर आहे. १८ महिन्याचे रोप प्रती रोप अ प्रतवारी ५० रुपये, ब प्रतवारी ३० रुपये तर क प्रतवारी २५ रुपये आणि १८ महिन्यावरील प्रती रोप अ प्रतवारी ६५ रुपये, ब प्रतवारी ५० रुपये, तर क प्रतवारी ४० रुपये असा सवलतीचा विक्रीचा दर आहे.

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होण्यासाठी व त्यांचा या कार्यात अधिकाअधिक सहभाग मिळवण्याकरिता वृक्ष लागवड करु इच्छिणारी खाजगी विना अनुदानित विद्यालये, महाविद्यालये यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांच्यासाठी ९, १८ व १८ महिन्यावरील १०० च्या आतील रोपांचा नाममात्र प्रति रोप नाममात्र दर १ रुपया राहील. तर १०१ ते ५०० रोपांकरीता नागरिकांसाठीचे नियमित सवलतीचे दर लागू राहतील.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर विभागात एकूण ६३ रोपवाटिका असून या रोपवाटीकांमध्ये एकूण ६६ लाख ५४ हजार लहान व उंच रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे. या रोपवाटीकांमध्ये वड, पिंपळ, अर्जुन आदी स्थानिक प्रजातींची रोपे असणार आहेत.

पुणे विभागात ६ लाख १० हजार उंच रोपे, लहान रोपे १० लाख ८० हजार अशी एकूण १६ लाख ९० हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सोलापूर विभागात १ लाख ६ हजार उंच, ९ लाख २३ हजार लहान रोपे, सांगली विभागात ४ लाख ८५ हजार उंच रोपे व १० लाख ९७ हजार लहान रोपे, सातारा विभागात ५ लाख ४२ हजार उंच रोपे व ७ लाख ३५ हजार लहान रोपे तर कोल्हापूर विभागात ३ लाख ६३ हजार उंच रोपे व ७ लाख १० हजार लहान रोपे अशी एकूण १० लाख ७३ हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

See also  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य यंत्रणेकडील कामांचा आढावा

सर्व शासकीय, अशासकीय संस्था, शैक्षणिक व औद्यागिक संस्था यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या नजीकच्या रोपवाटीकेतून सवलतीच्या दरात रोपे खरेदी करुन वृक्षलागवड व वनमहोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.