दूध भेसळीवरील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बैठकीचे आयोजन

पुणे : दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी तसेच दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. दूध भेसळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. मितेश घट्टे, सहायक आयुक्त अन्न व औषध एस. ए. गवते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस. के. डोईफोडे, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र बी. जी. महाजन आदी उपस्थित होते.

बैठकीत श्री. मोरे म्हणाले, दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक अविभाज्य भाग व महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगलं आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. हानीकारक पदार्थासह दुधात भेसळ केल्याने ग्राहकाच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होतो. काही समाजकंटक व्यक्ती दूध भेसळ करण्यासाठी आणि नफा वाढविण्यासाठी त्याची गुणवत्ता आणि सुरक्षेशी तडजोड करुन विविध फसव्या पद्धतींचा वापर करत आहेत, ही बाब चिंतेची असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दूध भेसळीमध्ये सामान्यपणे पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. दूध भेसळीमुळे मानवी शारीरिक समस्या, पचन, अॅलर्जी आणि दीर्घकालीन अवयवाचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करावे.

पुणे जिल्ह्यातील दूध संकलन स्वीकृती केंद्र, जिल्ह्यातील/ जिल्ह्याबाहेरील व परराज्यातून येणाऱ्या दूधाचे नमुने तसेच तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणी अन्न औषध प्रशासन विभागाने दरमहा करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दूध भेसळीबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती व डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल नोंदवून भेसळीबाबत आढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे डॉ. घट्टे यावेळी म्हणाले.

See also  स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागरिकांना दूध भेसळ आढळल्यास अन्न व औषध विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा fdapune2019@gmail.com या ईमेलवर संपर्क करुन माहिती द्यावी. तक्रार देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.