हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मान्यता

पुणे, दि. ३१ : राजगुरूनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाच्या विकास आराखड्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने आज मान्यता प्रदान केली. हा आराखडा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी सांस्कृतिक कार्य विभागास सादर करण्यात येणार आहे.

विधानभवन येथे आयोजित या बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, खेड- राजगुरूनपगरचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे आदी उपस्थित होते.

यावेळी स्मारकाच्या अनुषंगाने तयार केलेल्या विकास आराखड्याचे सादरीकरण वास्तुविशारदांनी केले. या स्मारकाच्या आराखड्याचे टप्पे करुन प्राधान्याने मुख्य भागाच्या विकासावर भर देण्यात यावा, असे पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले. यावेळी आमदार श्री. मोहिते पाटील यांनी विविध सूचना मांडल्या.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राजगुरुनगर, जि. पुणे येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास आराखडा समिती विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आली होती.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यासपूर्ण बैठका व स्थळ पाहणी करुन विकास आराखडा तयार केला. यामध्ये जन्मस्थान खोली व मुख्य स्मारक विकास आराखडा हा राज्य पुरातत्व विभागामार्फत तर परिसर विकास आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आला. याकरिता संकल्पनांबाबत स्पर्धा घेण्यात आली होती.

टप्पा क्र. १ हा पुरातत्व विभागामार्फत विकसित करण्यात येणार असून ९४ कोटी ९९ लाख रुपये खर्चाचा आराखडा यात समाविष्ट आहे. यामध्ये जन्मखोली, थोरला वाडा, मुख्य दरवाजा व स्मारकाचा जीर्णोधार, स्मारकातील वाचनालय, कॅफेटेरिया आदी तसेच रामघाट, चांदोली घाट, त्याकडे जाणारा दरवाजा व पायऱ्या, संरक्षित भिंत, वाहनतळ, पदपथ, अंतर्गत रस्ते, जमीन सौंदर्यीकरण (लॅंडस्केप), खुले सभागृह, पुतळे, शिल्पे (म्युरल्स), संपूर्ण स्मारकाचे विद्युतीकरण, प्रकाश व ध्वनी सादरीकरण (लाईट ॲण्ड साऊंड शो) आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

See also  महिलांवरील अत्याचार आणि महागाईचे उत्तर द्या ?- महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना सवाल

टप्पा क्र. २ व ३ हा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकसित करण्यात येणार असून १५९ कोटी १२ लाख रुपये खर्चाचा आहे. टप्पा २ मध्ये संग्रहालय, तालिम, देशभक्त निवास, कॅफेटेरिया, वाचनालय, वाहनतळ विकास, अस्तित्वातील रस्त्यांचा विकास, फर्निचर, विद्युतीकरण, परिसर विकास आदी बाबींसाठी ७७ कोटी ८२ लाख रुपये तर टप्पा क्र. ३ मध्ये नदीघाट विकास, गार्डन, संरक्षण भिंत, डिस्प्ले, म्युरल्स, होलोग्राम प्रोजक्शन व इतर बाबी यासाठी ५८ कोटी ६२ लाख रुपये तरतूद असून टप्पा २ व ३ च्या भूसंपादनासाठी २२ कोटी ६८ लाख रुपयांची आवश्यकता आहे.