बारामती मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्ना संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासदार सुप्रिया सुळे भेट घेत निवेदन दिले

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नांबाबत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यामध्ये प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी केली. त्याचबरोबर पालखी महामार्गावरील नीरा जंक्शन आणि लोणंद-सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावेत, पुणे सोलापूर रस्त्यावर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भुयारी मार्ग तयार करावा, तसेच लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, वरवंड, पाटस आदी गावांतील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात असे नमूद केले. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात वरवंड येथे भुयारी मार्ग आणि सहजपुर येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक सातत्याने करत आहेत. याबाबत आधीही चर्चा करण्यात आली होती. याकडे गडकरी साहेबांचे यांचे लक्ष वेधले.

पुरंदर तालुक्यात सासवड रस्त्यावर हडपसर ते दिवे घाट या पालखी महामार्गाचे रुंदीकरण, भोर तालुक्यात करंदी-कांबरे आणि भाटघर धरणाकडे राजगड वेळवंड खोऱ्यातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर पूल उभारणी करणे ही कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी केली. वेल्हा तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मढेघाट मार्गे महाड मध्ये जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याबरोबरच रस्त्यासाठी निधीची मागणी केली. याबरोबरच मुळशी तालुक्यातील भुगाव आणि घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हवेली तालुक्याच्या शहरी भागात येणाऱ्या खडकवासला मतदार संघात मुंबई बंगळूरु बाह्यवळण महामार्गाला संलग्न असा वडगाव बुद्रुक येथील उड्डाण पुलापासून वारजे पर्यंत मुठा नदीवर बारा मीटर रुंदीचा पूल उभारणी करण्याची मागणीही यावेळी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व कामांसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

See also  ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या धरणे आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा