पुणे : राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय सहसंचालक यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे आयोजित करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विभागीय सह संचालक आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठनिहाय संलग्न महाविद्यालये, त्यापैकी नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालये यांची माहिती व आढावा घेण्यात आला. नॅक मानांकनासाठी नोंदणी केलेल्या, मानांकन प्राप्त झालेल्या व मानांकन नसलेल्या महाविद्यालयांची माहिती, नावे आदी विद्यापीठांनी आपल्या संकेतस्थळावर अद्ययावत करून प्रसिद्ध करावी. मानांकन न घेतलेल्या महाविद्यालयांना ही प्रक्रिया करण्यासाठी नोटीस द्याव्यात. विहित कालमर्यादेत कार्यवाही न केलेल्या महाविद्यालयांना पुढील काळात नवीन प्रवेश थांबविणे, प्रवेश संख्या कमी, मर्यादित करणे तसेच त्यांची परीक्षा केंद्रे रद्द करणे अशी कार्यवाही विद्यापीठ कायद्यानुसार तसेच विविध नियम तरतुदी लक्षात घेऊन करावी, असेही श्री. पाटील म्हणाले,
तंत्र शिक्षण, औषध निर्माण शास्त्राचे पदविका शिक्षण देणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून (एनबीए) मूल्यांकन करून घेणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून नॅक व एनबीए मानांकनासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन, प्रोत्साहन द्यावे, असे श्री. रस्तोगी म्हणाले.
राज्यात १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये असून त्यापैकी १ हजार ११३ महाविद्यालयांची नॅक मानांकन प्रक्रिया पूर्ण आली आहे. २ हजार १४१ विना अनुदानित महाविद्यालयांपैकी २५७ चे नॅक मानांकन झाले आहे. उच्च शिक्षण विभागांतर्गत असलेल्या २८ शासकीय महाविद्यालयांपैकी २४ चे नॅक मानांकन झाले आहे. राज्यात ‘ए’, ‘ए+’ व ‘ए ++’ नॅक मानांकन असलेली २०२ महाविद्यालये आहेत. विद्यापीठ, महाविद्यालयांच्या गुणवत्तेच्या खात्रीसाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे अर्थात ‘नॅक’ मानांकन महत्वपूर्ण आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
घर साहित्य/शैक्षणिक महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा...