लोणावळा येथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विभाग, केंद्र शासन आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ या विषयावरील कार्यशाळेचे ११ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कार्ला, लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्धाटन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक गीता सिंह राठो़ड यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेस अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपमहासंचालक डॉ. सुभ्रा सरकार, तामिळनाडू राज्याच्या संचालनालयाचे संचालक एस. गणेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, दादरा आणि नगर हवेली, दमण, दीव आणि पुद्दुचेरी या राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

यावेळी श्रीमती राठोड यांनी राज्य उत्पन्न अंदाज तयार करण्याच्या सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करताना राज्य व जिल्हा स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये होणारे रचनात्मक बदल विचारात घेणे आवश्यक असल्याचे विषद केले.

आर्थिक व्यवहाराचे डिजीटायझेशन आणि घरपोच सेवा या सेवांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे श्री. गणेश म्हणाले. डॉ. सरकार यांनी सकल देशांतर्गत उत्पन्न अंदाज तयार करताना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाईन पेमेंट ट्रान्झॅक्शन्स या सारख्या आर्थिक कार्यांचा समावेश करणे हे एक आव्हान असल्याचे सांगितले.

श्री. आहेर यांनी राज्यास 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्याकरीता राज्याच्या आर्थिक सल्लागार समितीने तयार केलेल्या अंमलबजावणी आराखड्याबाबतही माहिती सांगितली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणेबाबतचा प्रकल्प राज्याने हाती घेतला असून संचालनालयाने जिल्हा उत्पन्नाचे अंदाज जिल्हा स्तरावर तयार करणे हा प्रकल्पही हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षमतावर्धन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी नियमितपणे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यशाळा करण्यात येते. या कार्यशाळेत राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर डेटाची आवश्यकता याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येते. तसेच राज्य उत्पन्नाचे महत्त्व आणि सकल देशांतर्गत उत्पन्नाचे अंदाज यामधील त्याचे महत्त्व अधोरेखित करत असतात.

राष्ट्रीय स्तरावर सकल देशांतर्गत उत्पन्नाचे अंदाज (जीडीपी) तयार करतांना वापरण्यात येणाऱ्या संज्ञा व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्याकरीता तसेच राष्ट्रीय लेखा पद्धती (एसएनए 2008) मधील शिफारसी, मार्गदर्शक तत्वांनुसार सामाईक दृष्टीकोन व कार्यपद्धतीशी सुसंगत असे राज्य उत्पन्नाचे अंदाज अधिक अचूकपणे कशाप्रकारे तयार करता येऊ शकतील याबाबत या कार्यशाळा राज्यांना मार्गदर्शक ठरण्यात मदत करतात.

See also  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन