६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिवला, स्कॉर्पिओ,बुलेट, स्प्लेंडरसह दोन कोटीचे बक्षिसे जाहीर; कोथरूडची महाराष्ट्र केसरी बेकायदेशीर?

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणून समजले जात असताना गेल्या दोन वर्षापासून या अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेमध्ये संभ्रम वाढतच आहे. मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज पुन्हा अधिकृत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या नावाने पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे व स्थायी समितीच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या कोथरूड येथे पार पडलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बेकायदेशीर ठरवत नव्याने 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे या पत्रकार परिषदेला कोथरूड येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या मल्लाचा वस्ताद अर्जुन पुरस्कारार्थी काका पवारही उपस्थित होते.

कुस्ती स्पर्धेत सध्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अधिकृत कोणती यामध्ये सर्व राज्यभरातील मल्लांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब लांडगे सर सर्व पदाधिकारी यांनी ६५ वी वरिष्ठ गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२३ तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी १६ ते २० नोव्हेंबर होणार असून सुधीर आण्णा पाटील अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व उस्मानाबाद तालीम संघ यांच्या सहकार्याने संपन्न होणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने १९६१ सालापासून आजपर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पाडत आहे. “महाराष्ट्र केसरी हा किताब देण्याचा सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला आहेत. कुस्तीगीर परिषदेने आज पर्यंत ६४ वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत आणि ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (उस्मानाबाद) धाराशिव या ठिकाणी संपन्न होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रमाणेच भव्य दिव्य आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी केला असून या स्पर्धेतही २ कोटी रुपयांची बक्षीस विजेत्यांना दिली जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र केसरी विजेता मल्लास मानाची गदा आणि स्कॉर्पिओ गाडी व उपा विजेता ट्रॅक्टर अन् नऊ वजन गटातील विजेत्यांना बुलेट व उपविजेतांना स्प्लेंडर गाड्या देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर बक्षीस वितरणाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

See also  राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

भारतीय कुस्ती संघाची जानेवारी महिन्यामध्ये भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती संघाची कार्यकारणी गैरकारभार व गैरवर्तुणुकीमुळे बरखास्त करून भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अस्थाई समितीमार्फत भारतीय कुस्ती संघाचा कारभार चालू केला असल्याचेही यावेळी पदाधिकारी यांनी सांगितले. जागतिक कुस्ती संघटनेने ही भारतीय कुस्ती महासंघाची सलग्नता काढून टाकलेली आहे. परंतु असे असताना एक अनाधिकृत कुस्ती संघटना बरखास्त झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे सलग्नता पत्र दाखवून सर्वामध्ये गैरसमज पसरवत आहेत. यावर कायदेशीर कारवाई करण्याची ही भूमिका लवकरच घेण्यात येणार असल्याचा इशाराही या पत्रकार परिषदेत मार्फत देण्यात आला आहे.

आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे मुंबई हायकोर्टाने सर्वाधिकार आबादीत ठेवल्याचे जाहीर करण्यात आले. कुस्तीगीर परिषदेचे सर्व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचे अधिकार अबाधित आहेत. त्यामुळे ६५ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत धाराशिव उस्मानाबाद येथे होणार आहेत. या स्पर्धेचा लोगोचे अनावरण यावेळी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, विजय बराटे, सुधीर पाटील, ललित लांडगे, रुस्तमै हिंद महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, हिंदकेसरी अमोल बराटे आदी उपस्थित होते.