जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

पुणे : तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्यातील सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी करुन नियोजित वेळेपूर्वी तसेच गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जेजुरी गड विकास आराखड्याच्या ३४९ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्याच्या १०९ कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.

आराखड्याअंतर्गत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज जेजुरी गड येथे सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. पुरातत्व विभाग आणि नियोजन विभागाच्या माध्यमातून कामांना गती देण्यात आली आहे. विकास आराखड्यातील एकूण ९ कामांपैकी ३ कामे सुरु आहेत. नवीन ४ कामे येत्या आठवड्यात सुरु होत आहेत तर एका कामांची निविदा प्रक्रिया सुरु असुन तेही काम माहे ॲाक्टोबरमध्ये सुरु होईल . त्यामुळे कामांना अधिक गती मिळेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.

मंदीर व परिसरात करण्यात आलेली अनियोजीत जोडण्या व बांधकामे काढून गडाला पूर्व वैभव देण्याचे नियोजित आहे. कामे पूर्ण करण्याचा कालावधी २ वर्षांचा असला तरी नियोजित वेळेपूर्वी कामे गुणवत्तापूर्व करावीत. तसेच कामे जलदगतीने पूर्ण होण्याच्यादृष्टीने या कामांसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

शिखर दुरुस्तीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विद्युत जोडणी, सांडपाणी व्यवस्थापन, भू सौंदर्यीकरण (लँडस्केपींग) आदी कामे मंदीराच्या मूळ बांधकाम व स्थापत्य शैलीस अनुसरुन करावीत, आदी सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुरातत्व विभागास दिल्या. मूळ शैलीत वापरण्यात आलेल्या दगड, चुना आदी साहित्यांचा वापर कामांमध्ये करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, मंदिराचे विश्वस्त पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते.

See also  वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद