तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : तांत्रिक शिक्षणाचे भविष्यातील महत्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना ‘सेंटर ऑफ एक्सलंस’च्या माध्यमातून रोजगारक्षम शिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त मंचर येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या नियामक सभेचे सदस्य देवेंद्र शहा, बाळासाहेब भेंडे, डॉ. काशिनाथ सोलनकर, प्राचार्य उत्तमराव आवारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांचे कार्य आणि विचाराचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नागरिकांनी सामाजिक जाणीव ठेवून यासाठी मदत करावी.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात बदल होत आहेत. वर्गखोल्यातील शिक्षणाबरोबरच वर्गखोल्याबाहेरही प्रयोगात्मक शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यानुसार शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न नीट समजून घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षणाचा उपयोग ज्ञान, रोजगार मिळण्यासाठी आपण केला पाहिजे. समाज माध्यमात प्रसारित होणारे विविध संदेश, चित्रफितीची खात्री न करता अफवांना तरुण बळी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. याबाबत तरुण पिढीने विचार केला पहिजे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

नव्या पिढीने महापुरुषांचा आदर्श समोर ठेवावा आणि आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय निश्चित करून त्यानुसार आत्तापासून वाटचाल करावी. आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यातून विद्यार्थ्यांना देश-विदेशात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज देण्यात येत आहे, या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वळसे पाटील यांनी केले.

अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला; आज या संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून यामध्ये सुमारे १७ हजार शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. अण्णाच्या दूरदृष्टीमुळे त्यांना रोजगार मिळाला आहे. आज संस्थेत सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. रयत शिक्षण संस्थेचे आज विद्यापीठात रुपांतर करण्यात आले असून या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गार्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी श्री. शहा, डॉ. काशिनाथ सोलंकर यांनीही विचार व्यक्त केले.

See also  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ८९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न