औंध : युवाशक्तीच्या वतीने प्रत्येक वर्षी २८ नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन यानिमित्ताने व्याख्याने आयोजित केली जातात. दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी औंधरोड येथील वेणूवन बुद्ध विहार परिसर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वसंतदादा साळवे यांचे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या विचारांची नवी पिढी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
वसंतदादा साळवे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन आणि कार्याला उजाळा देत असताना त्यांच्या जीवनातील अनेक महत्वाचे पैलू मांडले. समाजसुधारनेच्या संपूर्ण चळवळीचा महात्मा फुले पाया असून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे कळस आहेत हे सांगत असताना या चळवळीतले काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक नेत्यांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला पुढे आणलं पाहिजे आणि तो काळ समजून घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे त्याच जोमाने चळवळ अधिक बळकट करण्यासाठी आता तरुणांनी पुढे येण्यासाठीचे आव्हान त्यांनी केले.
या कार्यक्रमाला शहराच्या विविध भागातील नागरिक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल कांबळे यांनी केले. प्रस्तावना रोहन देसाई यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. रोहित आगळे होते. आभारप्रदर्शन स्वप्नील ओव्हाळ यांनी केले.