आझम कॅम्पस येथे ५ व ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

पुणे : जिल्हा क्रिडा कार्यालय, जिल्हा कृषी कार्यालय, पूना कॉलेज ऑफ आर्टस व सायन्स व राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आझम कॅम्पस पुणे येथे ५ व ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

क्रिडा व युवकसेवा संचालनालय यांच्या निर्देशानुसार युवांच्या कला गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्रतिवर्षी विविध स्तरावर युवा महात्सवाचे आयोजन करण्यात येते. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने युवा महोत्सवात राज्यासाठी ‘तृणधान्य उत्पन्न् वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान’ या संकल्पनेवर आधारित युवा महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सुचित करण्यात आले आहे.

युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागाअंतर्गत समूह लोकनृत्यlसाठी सहभाग संख्या १० आणि वेळ १५ मिनिटे असून प्रथम पारितोषिक ७ हजार, द्वितीय ५ हजार व तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये आहे. वैयक्तिक सोलो लोकनृत्य व वैयक्तिक सोलो लोकगीतासाठी सहभाग संख्या ५, वेळ ७ मिनिटे, प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार ५०० रूपये आहे. लोकगीतासाठी सहभाग संख्या १०, वेळ ७ मिनिटे, प्रथम पारितोषिक ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार ५०० रूपये आहे.

कौशल्य विकास विभागाअंतर्गत कथालेखनासाठी सहभाग संख्या ३, वेळ १ तास व १ हजार शब्द मर्यादा आहे. पोस्टर स्पर्धेसाठी सहभाग संख्या २ आणि वेळ १ तास ३० मिनिटे आहे. इंग्रजी व हिंदीतील वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभाग संख्या २ आणि वेळ ३ मिनिटे आहे. वरील तिन्ही स्पर्धांसह छायाचित्रण स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार ५०० रूपये आहे.

‘तृणधान्य उत्पन्नवाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान’ या संकल्पनेअंतर्गत सहभाग संख्या ३५ असून प्रथम पारितोषिक ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रूपये आहे. युवा कृती विभागात हस्तकलासाठी सहभाग संख्या ५, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रोडक्ट साठी सहभाग संख्या ७ असून प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार ५०० रूपये असे राहील.

युवा महोत्सवात सहभाग घेण्यासाठी वयोमर्यादा १५ ते २९ वर्षे अशी आहे. वयाची परिगणना १ एप्रिल २०२३ नुसार करण्यात येईल. स्पर्धकांना वयाबाबत सबळ पुरावा सादर करावा लागेल. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी क्रिडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२९३१११९ किंवा क्रिडा शिक्षक आसद शेख भ्रमणध्वनी क्रमांक ८४८४८०३५२९ वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवक मंडळे यामधील इच्छुक कलावंतांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

See also  लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन नितीन थोपटे व लिओ क्लबच्या अध्यक्षपदी लिओ वेदांत थोपटे यांची निवड.