पाषाण : पाषाण रस्त्यावरील आयशर या संस्थेजवळ मेट्रोचे काम सुरू असताना खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आला. हा हॅन्डग्रेनेड ब्रिटिश कालीन आहे. मेट्रोकडून पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला.
आयशर संस्थे जवळ मेट्रोचे पत्रे लावण्याचे काम सुरू होते. यावेळी काम सुरू असताना हँडग्रेनेड आढळून आले. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला प्राचारण केले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा हॅन्ड ग्रेनेड ताब्यात घेतला. तो जागेवरच निकामी करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हॅन्डग्रेनेड ब्रिटिश कालीन असून या ठिकाणी मेट्रोचे पत्रे लावण्याचे काम सुरू होते. त्याकरिता सुरू असलेल्या खुदाई दरम्यान हा हॅन्ड ग्रेनेड मिळून आला.