उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी; मांगूर मत्स्यपालनावर कठोर कारवाई होणार

पुणे : उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करणारे मत्सव्यवसायिक तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड व इंदापूर, सोलापूरमधील माढा व करमाळा व अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील परवानाधारक मत्स्यव्यावसायिक तसेच विनापरवाना मत्स्यव्यावसायिक अनधिकृत लहान मासळी मासेमारी करत असल्याचे आढळून आले आहे. त्याला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईचे आदेश दिले.

*लहान मासळी मासेमारी, मांगूरपालन करु नये*
उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करु नये. लहान मासळी मासेमारीकरीता वापरण्यात येणारी जाळी व साहित्य त्वरीत नष्ट करावे. प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांनी त्यांच्याकडील मांगूर मासा साठा नष्ट करावा. उजनी जलाशय संपादित क्षेत्रात असणारी शेततळी नष्ट करण्यात यावीत. संपादित क्षेत्रात अशा प्रकारचे कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

*मासेमारी करण्यासाठी परवाना बंधनकारक*
स्थानिक मत्स्यव्यवसायिकांनी उजनी जलाशयात मासेमारीसाठी आवश्यक परवाना नजीकच्या जलसंपदा विभाग शाखा कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा. परवाना नसलेल्या मत्स्यव्यवसायिकांवर विनापरवाना जलाशयात प्रवेश केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

See also  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण वारीदरम्यान "महाआरोग्य शिबिराचे" आयोजन