अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथ प्रदर्शनास अभुतपूर्व प्रतिसाद

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पुस्तक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनासाठी विजयस्तंभाच्या पाठीमागे ३०० पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विस्डम बुक फेअर २०२४’ चे आयोजन करण्यात आले. या बुक फेअरचे उद्घघाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोसले, वृषाली शिंदे, रवींद्र कदम, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.

बार्टीने अनुयायींना ८५ टक्के सवलतीच्या दरात ६ पुस्तक स्टाॅलवर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, भिवा ते बोधिसत्व, जातीव्यवस्थेचे निर्मूलन, बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे खंड आदी पुस्तके उपलब्ध करून दिली होती. देशभरातून आलेल्या भीमसैनिकांनी व अनुयायांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच बार्टीच्या पुस्तक स्टाॅलवर रांगा लावून पुस्तकांची खरेदी केली.

द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या शताब्दी वर्षानिमित्त बुक फेअरमध्ये साहित्यक, कवी, लेखक, विचारवंत, कलावंत यांच्यासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये देशभरातून आलेल्या अनेक कवी, लेखक, साहित्यिक विचारवंत यांनी या चर्चासत्रात ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाचे देशाच्या अर्थकारणात असलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.

प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक डॉ. संभाजी बिरांजे, समतादुत प्रकल्प अधिकारी हृदयनाथ गोडबोले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.बार्टीने बुक फेअरचे आयोजन केल्याबद्दल पुस्तक स्टाॕलधारक तसेच पुस्तकप्रेमीनी बार्टीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

See also  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विशेष सत्कार