कोंढवा : मागील वर्षी मोठा गाजावाजा व खर्च करून माँ खादिजा प्रसूतीगृह सुरू करण्यात आले. परंतु आज अखेर तिथे प्रसूतीगृहाच्या कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. सदरच्या जागी मोठी बिल्डिंग बांधली असून फर्निचर ही नव्याने दिले आहे. या परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत असून त्यांना महिलांना घेऊन तपासणी व इतर सर्वच बाबींसाठी कोंढवा बुद्रुक येथे जावे लागते. त्यामुळे आम आदमी पार्टीने हे प्रसुतिगृह तातडीने सुरू करावे अशी मागणी महानगरपालिकेकडे केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा एम अली सय्यद यांनी दिला आहे.
या प्रसुतीगृहाच्या संकल्पना बाबत स्थानिक नगरसेविका परवीन शेख यांचे नावे चमकोगिरी करणारा मोठा बोर्ड लावलेला असून प्रत्यक्षात मात्र वरचा मजला पूर्णपणे बंद असून दरवाजांना कुलुपे लावलेली आहेत.
सदरच्या जागी चे प्रसूतीगृह तातडीने सुरू करावे व त्यासाठी योग्य त्या वैद्यकीय प्रशिक्षित स्टाफची नेमणूक करावी असे निवेदन आम आदमी पार्टी तर्फे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांना दिले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, एम अली सय्यद, सतिश यादव, संजय रणधीर, मिलींद सरोदे, मोईन मडकी, नितीन कांबळे, रौफ शेख आदी उपस्थीत होते.