पुणे – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची नावे वगळल्याचा निषेध माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना मोहन जोशी यांनी निवेदन पाठविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीने ‘७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ नियमावली’मध्ये बदल केले आहेत. दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या नावे आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या नावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. नियमावलीत बदल करताना मंत्रालयाने ही दोन्हीही नावे बदलली आहेत, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या काळात चित्रपट, नाटक आदी कलांना उत्तेजन दिले होते. याकरिता त्यांच्या स्मरणार्थ नवोदित दिग्दर्शकाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता इंदिराजींच्या नावे पुरस्कार दिला जात होता. स्वर्गीय अभिनेत्री नर्गिस दत्त या त्यांच्या चित्रपटातील योगदानामुळे ‘मदर इंडिया’ म्हणून ओळखल्या जात होत्या. या दोन्हीं महनीय व्यक्तींची नावे पुन्हा दिली जावीत, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्याद्वारे करीत आहोत, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.