पुणे: सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. स्वच्छता सेवक विविध प्रकारचा कचरा गोळा करतात, यात ओला, सुका, जैविक, इ कचरा आणि रेड डॉट कचऱ्याचा समावेश आहे. मात्र यातील जैविक कचरा आणि सॅनिटरी पॅड ची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप च्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती संचालित सेवा भवन येथे इन्सिनरेटर (केरकचरा, इत्यादी जाळून टाकण्याची भट्टी) बसविण्यात आले, त्याचे लोकार्पण करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर,जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह राजन गोऱ्हे, कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर, सह खजिनदार चंदनजी कटारिया, प्रमुख अतिथी कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधाताई एडके,कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष कांचनताई कुंबरे,कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला,उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, मा. नगरसेविका वासंतीताई जाधव इ मान्यवर उपस्थित होते.
पॅडमॅन चित्रपटामुळे मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन बाबतीत नागरिक मोकळेपणाने बोलायला लागले, त्याची उपयुक्तता ही सर्वांना पटली मात्र अद्याप सॅनिटरी नॅपकिन च्या विल्हेवाटी बद्दल पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यामुळे क्रिएटिव्ह फाउंडेशन ने हा उपक्रम हाती घेतल्याचे संदीप खर्डेकर आणि मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. येणाऱ्या काळात कचऱ्याची समस्या गंभीर होणार आहे त्यामुळे आम्ही आमचा सामाजिक कार्यासाठीचा राखीव निधी हा कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटी साठी खर्च करणार असल्याचे ग्लोबल ग्रुप चे संचालक संजीव अरोरा आणि मनोज हिंगोरानी यांनी जाहीर केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन लवकरच मोफत रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु करणार असून या वर्षात आरोग्य विषयक कार्यक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे क्रिएटिव्ह चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.