कात्रज – गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे भूषण आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी गुणवंत होण्यासोबतच चारित्र्यसंपन्नही व्हावे, असा महत्वपूर्ण सल्ला कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांनी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिला.
कात्रज परिसरातील वंडरसिटी सोसायटी येथे या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठाण’च्यावतीने गौरव व सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी गिरीराज सावंत हे बोलत होते.
वंडरसिटी सोसायटीच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या या गुणगौरव व सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक शरद जीने, प्रा. चंद्रकांत कुंजीर, कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक गिरीराज सावंत, वंडरसिटी सोसायटीचे अध्यक्ष संजय वाघ, संतोष शिळीमकर, जनार्धन भाटे, दिलीप जगताप, कांतीलाल लिपारे, गणेश वनशीव, राजाराम वीर, डॉ. शिंदे हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन पालकांसह सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थी, विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून, पुढील करिअरसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. दिलीप जगताप यांनी करून उपस्थितांचे आभार मानलेत. कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.