ऐश्वर्य कट्ट्यावर उलगडले धगधगते सामाजिक वास्तव

कात्रज : एरवी गप्पांच्या मैफिलीत रंगून जाणाऱ्या आणि गप्पांची बहार उडवून देणाऱ्या कट्ट्यावर आज मात्र सारेचजण अंतर्मुख झालेले होते. समाजात सध्या घडत असलेल्या दिल्ली, बदलापूर येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजातील एक धगधगते वास्तवच सगळ्यांच्या समोर उलगडले.


ऐश्वर्य कट्ट्याचे आजचे मानकरी होते, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. मंगल मोंडवे, जिजाई फाउंडेशनच्या संचालक ज्योती धुमाळ आणि लोकमत डिजिटलच्या ब्युरो चीफ अश्विनी जाधव केदारी. समाजकारण, पत्रकारिता आणि पोलीस प्रशासन अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील रणरागिणी आज कट्ट्यावर उपस्थित होत्या. दुर्गेच्या या तिन्ही रुपांनी आज उपस्थित सर्वांनाच समाजाच्या आजच्या परिस्थितीबद्दल चिंतन करायला लावले. समाजातील एक दाहक आणि ज्वलंत वास्तव त्यांनी आपल्या संवादातून समोर आणले.
दिवसभर ड्युटी व रात्रभर जागरण करूनदेखील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे खाकी वर्दीतच कट्ट्यावर दाखल झाल्या. त्यांचे आगमन म्हणजे जणू एखादं वादळच आत आलं, असं सर्वांना वाटलं. त्यांनी येताच सगळ्या कट्ट्याचा ताबा घेतला. प्रश्नोत्तरांना फारसा वाव न देता त्यांनी समाजातील जळजळीत वास्तव सर्वांसमोर ठेवले आणि सर्वांच्याच डोळ्यात अंजन घातले. त्या म्हणाल्या, आजच्या परिस्थितीला घरातले पालकच जबाबदार आहेत. लहान वयात मुलं चुकीचं वागतात कारण त्यांच्यांकडे ते पालकांकडून आलेले असते. संस्कार देण्यात, वेळ देण्यात, चांगल्या गोष्टी देण्यात ते कमी पडलेले असतात. कुठलीही गोष्ट अचानक घडत नसते त्यासाठी पालकांनी जागरुक राहून आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे.


समाजात आपल्याच आजुबाजूला घडणाऱ्या काही वास्तव घ़टना त्यांनी अशा सांगितल्या की अक्षरशः अंगावर शहारे आले. आपण समाज म्हणून नक्की कुठे चाललोय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांनी ऐश्वर्य कट्टासारखी संकल्पना खूप समाजोपयोगी असल्याचे सांगितले आणि लागेल त्या कामात सहयोग देण्याचे आश्वासन दिले. या वेळी ज्योती धुमाळ यांनी झोपडपट्ट्यांमधील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी जनता वसाहतीतून जे काम सुरू केले आहे त्याची माहिती दिली. पालकांचे मन वळवून मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे हेच या प्रक्रियेतील सगळ्यात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार अश्विनी जाधव केदारी यांनी आपली पत्रकारितेची वाटचाल सांगितली. एआय सारख्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचाच नव्हे तर सर्वच क्षेत्रांपुढे आव्हाने उभे राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
या वेळी सर्व मान्यवरांचे औक्षण करून, फेटा बांधून शंखनादाने स्वागत कऱण्यात आले. त्यांना मानाची मोत्याची माळ, सन्मानपत्र आणि आरोग्यसाथी हे पुस्तक भेट देण्यात आले. कट्ट्यासारखी अभिनव कल्पना राबवल्याबद्दल या सर्वांनीच आनंद व्यक्त केला.
या वेळी माझ्यासह विलासराव भगणे, पराग पोतदार, दिलीप जगताप,  पांडुरंग मरगजे, शंकर कडू, नेमीचंद सोळंकी, हितेश तन्ना, मंगेश साळुंखे, नितीन रांजणे, विराज रेणूसे, जयदीप निंबाळकर, सुनील सोनवणे, काशिनाथ शेंडकर, रोहित रेणुसे, प्रियांका अरगडे, सायली सौंदनकर, शिरीष चव्हाण मनोज तोडकर व आप्पा रेणुसे मित्रपरिवार  उपस्थित होते.

See also  हडपसर विधानसभा मतदार संघातील माघार घेतलेल्या बहुतांश अपक्षांचा महाविकास आघाडीला पाठिंबा