बाणेर : शस्त्र पूजनम्हणजे शस्त्र, संकल्प, संघटन व विवेक या चतुर्विद शक्तीची साधना होय. वर्तमान लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेत मतदारांना मिळालेला मतदान अधिकार हे देखील एक शस्त्र आहे. या शस्त्राचा राष्ट्रप्रेमी समाजाने विवेकाने वापर करावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री दिलीप क्षीरसागर यांनी विद्यापीठ भागाच्या शस्त्र पूजन कार्यक्रमात म्हाळुंगे येथे बोलताना केले.
संघटित हिंदुशक्तिने राष्ट्रहित लक्षात घेऊन मतदान करण्यासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
रणभूमी तसेच राष्ट्रजीवनातील सामाजिक, सांस्कृतिक,वैज्ञानिक, क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रातील विजयी कामगिरीचे स्मरण विजयादशमीच्या निमित्ताने करायचे असते.विजयी वीरांचा इतिहास जसा लक्षात ठेवायचा असतो तसाच पराकोटीचा संघर्ष करून विजयी होऊ न शकलेल्यांचा इतिहास तेवढाच प्रेरणादायी असतो असे त्यांनी सांगितले.
कलियुगातील संघशक्ती हीच शक्ती असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची साधना करीत आहे. हा देश सर्वार्थाने परमवैभवाला नेण्यासाठी धर्माचे संरक्षण,आचरण आणि विजयी अशा हिंदूंच्या संघटित कार्यशक्तीने हे साधणार आहे असे ते म्हणाले.
परमवैभवामध्ये समाजातील शेवटच्या घटकाचा विकास ही संकल्पना संघाची असल्याचे ते म्हणाले. धर्म म्हणजे कर्मकांड नसून कर्तव्यबोध आहे आजच्या काळात समूहधर्म आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी सोमनाथ मंदिर ते अयोध्या राम मंदिर पुनर्निर्माण हे सामूहिक शक्तीच्या विजयाचे जागरण असल्याचे प्रतिपादन केले.
सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन पर्यावरण रक्षण,स्वबोध व नागरी कर्तव्य या पंचपरिवर्तनाचा संघाने आग्रह धरला असून सर्व समाजाच्या सहकार्याने हे परिवर्तन यशस्वी होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आज संध्याकाळी रा. स्व. संघ विद्यापीठ भाग (औंधनगर, पाषाणनगर, सुसनगर आणि बाणेर बालेवाडीनगर ह्यांचा एकत्रित विजयादशमी उत्सव म्हाळुंगे येथील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ उद्योजक गिरीधर काळे म्हणाले की वेद आणि पुराणांच्या वैज्ञानिक शोधांची शास्त्रीयपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी संघासारखी संघटना करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यासपीठावर भाग संघचालक श्री सुभाष कदम आणि औंध नगर संघचालक श्री सुनील मुतालिक उपस्थित होते.
स्वयंसेवकांनी नियुध्द, दंडयोग, योगासन, संघ समता आणि घोषाचे प्रात्यक्षिके सादर केले. स्वयंसेवकांनी सांघिकपणे संस्कृत गीत सादर केले. ह्या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
घर ताज्या बातम्या लोकशाहीमध्ये मतदारांना मिळालेला मतदान अधिकार हे देखील शस्त्र आहे – दिलीप क्षीरसागर