भाजपच्या पहिल्या यादीत ‘कसबा’ नाही
आश्चर्याचा धक्का

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. पण, त्यात भाजपसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या ‘कसबा’ विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही, याचे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुणे महापालिका हद्दीत विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत. त्यापैकी कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर या ३ विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पर्वती मधून माधुरी मिसाळ या चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पहिल्याच यादीत या तिघांची नावे जाहीर झाल्यामुळे त्यांच्यात आनंद आणि उत्साह दिसत आहे. मात्र, कसबा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. वास्तविक पहिल्या यादीत कसब्याचा उमेदवार जाहीर होणे अपेक्षित होते. या मतदारसंघातून २००९ आणि १४ च्या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते. १९ साली बापट लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांच्या जागी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. त्या निवडून आल्या. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि तिथे काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर निवडून आले. हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्याच्या जिद्दीने भाजप कामाला लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना या विधानसभा मतदारसंघात १५हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपचा उत्साह वाढला आणि भाजप कार्यकर्त्यांना वाटत होते की, पहिल्या यादीतच कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होईल.

या मतदारसंघात पोटनिवडणुकीत महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली होती. ते पुन्हा इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे सुद्धा कसब्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल यांचे नाव देखील इच्छुक म्हणून घेतले जाते. दरम्यान, सकल ब्राह्मण समाजाने या मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्या अशी मागणी भाजपकडे केली आहे. या मागणीचा पक्ष किती गांभीर्याने विचार करेल? हा भाग वेगळा पण, जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या चर्चा होतच रहाणार आहेत.

See also  भारतीय बाजारात सोन्याला झळाळी. प्रति १० ग्राम ६० हजाराच्या पार.