कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पन्नास वर्षे झाली तरी  दिमाखात उभा सिंधुदुर्गातील पुतळा आठ महिने सुद्धा टिकला नाही हे भाजपाचे पाप आहे – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास 50 वर्ष झाली तो अजून दिमाखात उभा आहे. सिंधुदुर्गातील पुतळा अवघे 8 महिने सुद्धा टिकला नाही. हे सगळे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. त्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम जनतेने करावे. भाजपला महाराष्ट्रात कुठलेही स्थान नाही असा इशारा देण्याची वेळ या निवडणुकीत आली आहे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रविवारी केला.


कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी डॉ कोल्हे कोथरूड येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे कोथरूड येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, विकास पासलकर, माजी नगरसेवक शिवा मंत्री, दामू कुंबरे, नंदू घाटे, डॉ. अभिजित मोरे, स्वप्निल दुधाने, किशोर कांबळे, रविंद्र माझिरे, गिरीश गुरनानी, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ कोल्हे म्हणाले की, चप्पल विकत घेता येते. शर्ट, मोबाईल विकत घेता येतो. पण आमदार आणि मंत्रिसुद्धा विकत घेता येतो हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेआहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून दया असे आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा भाजपने त्यांच्या पाठीवर वार करून
शिवसेना फोडली. जो हे वाईट काम करतो त्याला माफी नाही असेही ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, कोथरूडला 365 दिवस म्हणजे 24 बाय 7 आपल्या हक्काचा माणूस जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व कोथरूडचा विकास करण्यासाठी हवा आहे. ते काम फक्त चंद्रकांत मोकाटेच करू शकतात. ते आपल्या हक्काचे आहेत. त्यांना आपल्याला आमदार करायचे आहे. कोल्हापूरचे पार्सल मतदारांनी परत कोल्हापूरला पाठवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचे भाषण झाले. यानंतर त्यांची मोकाटे यांच्या प्रचारासाठी कोथरूड भागात पायी व जीपमधून पदयात्रा झाली. या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

See also  महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन