ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार; ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ

पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आणखी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. ना. पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुणे मेट्रोच्या सहकार्याने ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, अनिलकुमार कोकाटे, अग्रवाल, ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महानगरांमध्ये पर्यावरणपूरक मेट्रोचे जाळे विस्तारण्यावर सरकारचा भर आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी कोथरुडमध्ये वर्षभरापूर्वी शटल बससेवा सुरू केली, जी आज अत्यंत यशस्वी ठरली आहे.” 

ते पुढे म्हणाले की, “१९८२ पासून माझा पुण्याशी संबंध असून, नागरिकांनी स्वतःच्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, अशी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. याच भावनेतून ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकावर ‘प्रीपेड रिक्षासेवा’ सुरू केली, ज्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी ‘रिक्षामित्र फीडर सेवा’ सुरू करत आहोत. या उपक्रमालाही पुणेकर नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, “राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री समाजहिताचे वेगवेगळे उपक्रम अतिशय शांतपणे आखतात आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करतात. यापूर्वी ना. पाटील यांनी सुरू केलेल्या शटल बससेवेचा सर्वाधिक फायदा सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवा देखील नक्कीच यशस्वी होईल.” 

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले की, “सध्या पुणे शहरात खासगी आणि सार्वजनिक वाहतूक अशी स्पर्धा पाहायला मिळत आहे, जी मुळात निरर्थक आहे. शहराचे वाढते आकारमान पाहता, एका मर्यादेनंतर रस्त्यांची रुंदी वाढवणे शक्य होणार नाही. तसेच, मेट्रो शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात जाऊन घरापर्यंत सेवा देऊ शकत नाही. त्यासाठी रिक्षा हाच सर्वोत्तम पर्याय असून, त्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना सेवा देऊ शकतात. त्यामुळे आजची ही सेवा भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल.” 

See also  चांदणी चौक (एनडीए चौक) प्रकल्पातील रस्त्यांचे अर्धवट कामे असताना उद्घाटनाची घाई का करण्यात आली? - कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले.