नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक – डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचे मत; ‘ब्रह्मसखी’ तर्फे ब्राह्मण उपवधू-वरांचा ‘प्रत्यक्ष संवाद’

पुणे: “केवळ सौंदर्य, चांगले वेतन किंवा श्रीमंती नव्हे, तर नात्यांमधील विश्वास, सुसंस्कृतपणा आणि एकत्र कुटुंबपद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक असते. एकमेकांना सांभाळून घेत, मने जुळली, तर पती-पत्नीचे नाते घट्ट होते. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करत नाते, करिअर फुलवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,” असे मत युरोकूल हॉस्पिटलच्या संचालिका, प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधुवर मंडळातर्फे खास उपवधू-वरांसाठी ‘प्रत्यक्ष संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्वेनगर येथील घरकुल लाॅन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी व ‘देणे समाजाचे’ संस्थेच्या प्रमुख वीणा गोखले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ‘ब्रह्मसखी’च्या संचालिका नंदिनी ओपलकर, गीता सराफ, ज्योती कानोले, तृप्ती कुलकर्णी उपस्थित होत्या. ३५० मुले व १४० मुली असे ४९० विवाहेच्छूक वधू-वर यामध्ये सहभागी झाले होते.

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या, “विवाहावेळी सांसारिक जीवनाच्या कल्पना स्पष्ट असाव्यात. योग्य वयात विवाह, अपत्य आणि त्यांचे नेटके संगोपन व्हायला हवे. अलीकडे मूल होऊ न देण्याचे, घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून, ही चिंतेची बाब आहे. सासू-सासऱ्यांना आईवडिलांप्रमाणे मानून त्यांच्या मनात जागा केली, तर संसार सुखाचा होतो. घरात आजी-आजोबा असतील, तर कुटुंब सुखी राहते. सुखदुःखात आपली माणसे उपयोगी येतात. त्यामुळे वेगळे राहण्याचा विचार करू नये.”

वीणा गोखले म्हणाल्या, “ब्रम्हसखी समाजासाठी काम करतेय याचा आनंद आहे. तरुण वयातील मुलामुलींचे विवाह होणे अवघड होत चालले आहे. अशावेळी लग्नाळू मुलामुलींना समोरासमोर आणून आपला जीवनसाथी निवडण्याची संधी देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. लग्नानंतर दोघांनीही घरात ‘सपोर्ट सिस्टीम’ उभारावी. उतारवयात ‘शेअरिंग, केअरिंग’साठी अनेकांना जोडीदार हवा असतो. तेव्हा पन्नाशीनंतरच्या एकल लोकांसाठीही पुढाकार घ्यावा.”

नंदिनी ओपळकर म्हणाल्या, “वधू-वरांसाठी ब्रह्मसखीच्या वतीने वैविध्यपूर्ण उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे राबविले जात आहेत. ‘प्रत्यक्ष संवाद’ सारख्या उपक्रमातून इच्छूक मुलामुलींना परस्पर संवादाची व त्यातून जोडीदार निवडण्याची संधी मिळेल.” अस्मिता पांडे यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती कुलकर्णी आणि ज्योती कानोले  गीता सराफ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

लग्नाळूंना सुखावणारा प्रत्यक्ष संवाद
सनई-सतारीचा मधुर नाद… वयोगटानुसार बसलेले उपवधू-वर… त्यांच्यात चाललेला प्रत्यक्ष संवाद… आपल्या आवडीनिवडींची, अपेक्षांची केलेली चर्चा… त्यातून एकमेकांची झालेली पसंती… सख्याला सखी अन सखीला सखा मिळण्याचा हा अनोखा उपक्रम रविवारी पुण्यात अनुभवायला मिळाला. ब्रह्मसखीच्या प्रत्यक्ष संवाद कार्यक्रमात लग्नाळू मुलामुलींचा हा माहोल सुखावणारा होता.

See also  भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न