पुणे : – गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल माफी मागावी व पंतप्रधानांनी तोबडतोब त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी आज काँग्रेस भवन येथे खासदार मा. रजनीताई पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून केली.
यावेळी खासदार मा. रजनीताई पाटील पत्रकारांना संबोधित करताना म्हणाल्या की, ‘‘भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होत आहेत. तरीही पंतप्रधान मूग गिळून गप्प कसे काय आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून पंतप्रधानांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.’’
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदशे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, देवीदास भन्साळी, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, कैलास गायकवाड, गोपाळ तिवारी, राज अंबिके, प्राची दुधाने, अर्चना शहा, प्रा. वाल्मिक जगताप आदी उपस्थित होते.