माझ्या आईने भाजपा पक्षासाठी कसब्यात केलेल्या कार्याचा आदर व्हायला हवा – कुणाला टिळक

पुणे : माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही. माझ्या आईने भाजप पक्षासाठी कसब्यात केलेल्या कार्याचा आदर व्हायला हवा, असे कुणाल टिळक यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एका कार्यक्रमात कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली होती. मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे दोन वर्षांच्या काळात कसब्यातील मतदारांशी असणारा त्यांचा संपर्क तुटला होता. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांना मुक्ताताईंच्या सेवेसाठी बराच वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांचाही कसब्यातील राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. याच कारणामुळे आम्ही कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिली, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला अप्रत्यक्षपणे आपली भूमिका मांडत कुणाला टिळक यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले
मी एवढंच सांगेन की, माझ्या आईने गेली २०-२५ वर्षे कसब्यात काम केले. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क दोन वर्षांच्या आजारपणाच्या काळात नक्कीच कमी झाला नव्हता. त्यामुळे कसब्यात सहानुभूतीची एक लाट होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजप पक्ष मैदानात उतरला तेव्हा वेगळ्याप्रकारे झालेले मतदान दिसून आले. २०-२५ वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये कमी होत नसतो. माझी आई आजारी असतानाही कार्यक्रमांना जात होती. तिने कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निधी आणला होता, विकासकामेही सुरु होती. गिरीश बापट यांच्यानंतर माझ्या आईने कसबा मतदारसंघ बांधून ठेवला होता. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या कार्याचा आदर झाला पाहिजे. माझ्या आईच्या कार्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही.

यावेळी कुणाल टिळक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कसब्यातून लढण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. कसबा पोटनिवडणुकीतही अनेक लोकांचा सेल्फ इंटरेस्ट नसतानाही कोथरूड, खडकवासला, शिवाजीनगर परिसरातील लोकं कसब्यात ठाण मांडून होती. पुढच्या निवडणुकीत कसब्यात बदल दिसतील, याची खात्री आहे, असा विश्वासही यावेळी कुणाल टिळक यांनी व्यक्त केला.

See also  नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधातमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन